रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा; पण चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र गतवर्षीची सरासरी अजून गाठलेली नाही. पाऊस कमी झाल्याने भविष्यात लवकर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यावर उपाय म्हणून जलसंधारण म्हणून जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे बांधले जाणार आहेत. १५ ऑगस्टला त्याचा मुहूर्त केला जाईल. डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत एक हजार ४७५ नळपाणी योजनांचा ८२० कोटींचा आराखडा तयार केला आहे. पैकी ८७९ योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या सूचनेनंतर त्यांनी ही माहिती दिली. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आदी उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, की जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात एक हजार १८१ योजना होत्या; परंतु २०२२-२३ मध्ये त्या एक हजार ४७५ योजनांचा ८२० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात ८७९ योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. २८८ योजनांवर काम लवकरच सुरू होईल; तर ३३ योजनांची कामे सुरू झाली आहेत. यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला लवकर पाणीटंचाईला तोड द्यावे लागण्याची भीती आहे. त्या अनुषंगाने आम्ही तयारी सुरू केली आहे. जलसंधारण योजनेतून जिल्ह्यात ७५ वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. हे पक्के बंधारे असतील.त्यांना पाणी सोडण्यासाठी व साठवण्यासाठी लोखंडी झडपा बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीसाठा करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ७५ ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. १५ ऑगस्टला वनराई बंधाऱे बांधण्याचा मुहूर्त केला जाईल. डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वनराई बंधाऱ्याच्या मॉडेलमध्ये येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून बदल करण्यात आले आहेत. लोकसहभाग आणि ‘सीएसआर’मधून यावर खर्च करण्यात येणार आहे.