जिल्ह्यातील भाट्ये येथील ड्रोन प्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उदघाटन ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भाट्ये समुद्रकिनारी होणार आहे. राज्यातील ७ सागरी जिल्ह्यांकरीता एकुण ९ ड्रोनची सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहे. आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत राज्यातील ७ सागरी जिल्ह्यातील ७ ठिकाणी ड्रोन प्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन होणार आहे. सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता मत्स्य विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येते. गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही तसेच अनधिकृत नौकांचा पाठलाग करीत असताना त्या पळून जातात. अशा नौकांना पकडणे जिकरीचे होते. गस्ती नौके सोबतच राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अशा नौकांवर सागरी कायद्यातंर्गत कठोरपणे कारवाई करणे सोईचे होईल. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे.