रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय व सायन हॉस्पिटल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात ० ते १८ वयोगटातील मुलांकरीता तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिरात २६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.शिबिरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाकडील पथकामार्फत हर्निया, हायड्रोसिल, जननेंद्रियाचे आजार व इतर आजाराने शस्त्रक्रियेस पात्र एकूण २६ मुलांवर महात्मा फुले जनआरोग्य योजना व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून तपासणी,उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शिबिरामध्ये सायन हॉस्पिटलचे पेड्रीऍटीक विभागाचे
विभागप्रमुख डॉ. पारस कोठारी यांनी ० ते १८ वयोगटातील ३ गंभीर शस्त्रक्रिया, हर्निया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हायड्रोसिल तसेच जननेंद्रियाच्या शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रियागृहामध्ये सकाळी ८ ते रात्री ११ असे सलग ११ तास न थकता डॉ. कोठारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शस्त्रक्रिया केल्या. शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिर यशस्वीतेकरीता डॉ. ज्ञानेश विटेकर, डॉ. गुरव, डॉ. घोसाळकर, डॉ. मंगला, डॉ. सपाटे, डॉ. प्रांजली घोसाळकर, शस्त्रक्रिया विभागातील व रुग्णालयीन सर्व कर्मचारी, डॉ. नेहा विटेकर व आरती कदम यांचे मोलाचे योगदान लाभले.
ऑर्थो, प्लास्टिक सर्जरी, ईएनटीचे शिबिर
डॉ. कोठारी यांनी जिल्हा रुग्णालयामधील शस्त्रक्रिया विभागातील सुविधा अप्रतिम असल्याचे विशेष नमूद केले. शिबिराचे उत्तम नियोजन व रुग्णालयीन सर्जन टीमचे विशेष कौतुक केले. पुढील कालावधीमध्ये ऑर्थो, प्लास्टीक सर्जरी, ईएनटी अशा प्रकारचे विविध शिबिराचे आयोजन केल्यास सायन हॉस्पिटल मुंबई मार्फत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासित केले.
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात सायन हॉस्पिटलच्या वतीने बालकांवर शस्त्रक्रिया करणारी टीम. डॉ. पारस कोठारी यांच्यासमवेत डॉ. संघमित्रा फुले, डॉ. मंगला, डॉ. सपाटे, प्रांजली घोसाळकर, नेहा विटेकर आदी.