आयुर्वेद आणि वनौषधींचा पुरस्कार करणाऱ्या रामदेवबाबांच्या पतंजली कंपनीच्या दिव्या दंत मंजनात माशाचे घटक वापरले जात असल्याची बाब समोर आली आहे. यावरून एका वकील महिलेने पतंजली कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
पतंजलीकडून त्यांच्या उत्पादनांमध्ये शाकाहारी घटकांचा वापर केला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, पतंजलीच्या दिव्या दंतमंजनात समुद्र फेन (कटलफिश) वापरण्यात येत आहेत. त्यामुळेच मी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे, असे वकील शाशा जैन यांनी सांगितले.
दिव्या दंतमंजनात मांसाहारी घटक असताना कंपनी रेड ऐवजी ग्रीन लेबलसह हे उत्पादन विकते. हे ग्राहकहक्काचे तसेच लेबलिंग कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे जैन यांनी नोटिशीत नमूद केले आहे. यातून शाकाहारींच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
समुद्र फेन काय आहे?
समुद्रात आढळणारा कटल मासा जेव्हा मरतो तेव्हा त्याची हाडे पाण्यात विरघळतात आणि पृष्ठभागावर तरंगू लागतात. जेव्हा जास्त कटल माशांची हाडे पृष्ठभागावर येतात तेव्हा ते दुरून फेस किंवा फेनसारखे दिसतात. यामुळे त्याला समुद्र फेन म्हणतात. मच्छीमार हा फेन गोळा करून वाळवून विकतात. याचा वापर चित्रकला, शिल्पकला आणि औषधांमध्ये केला जातो.