मुंबई: देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टरमाइंड आहेत. पडद्यामागून तेच हे सगळं घडवून आणत असून त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याच्या नवाब मलिक यांच्या आरोपांमुळं फडणवीस भडकले आहेत. ‘मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन,’ असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. ‘नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत याचे पुरावे जाहीर करणार,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांनी मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिलं. नवाब मलिक यांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत, असं सांगतानाच, फडणवीस यांनी मलिकांवर उलट आरोप केले. ‘नवाब मलिक यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यामुळं त्यांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही काही बोलू नये. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, याबाबतचे सर्व पुरावे मी मीडियासमोर मांडणारच आहे, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडंही मी हे सगळे पुरावे देणार आहे. ते पुरावेच असे असतील की चौकशी करावीच लागेल. त्यामुळं दिवाळी संपण्याची वाट बघा. त्यांनी सुरुवात केली तर ह्याचा शेवट करावाच लागेल. मी काचेच्या घरात राहणारा माणूस नाही हे मलिक यांनी लक्षात घ्यावं,’ असं फडणवीस यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहेत. त्याचा संदर्भ देत फडणवीसांना मलिक यांच्यावर निशाणा साधला. ‘स्वत:च्या जावयाच्या विरुद्धची केस कमकुवत व्हावी. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन या प्रकरणात सुटण्यासाठी मदत करावी असा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोपही फडणवीस यांनी केला.