मुसळधार पाऊस!, कोकणात पावसाने थैमान; अतिवृष्टीचा इशारा, एनडीआरएफचे पथक दाखल

- Advertisement -

जुलै महिना सुरू होताच पावसाने दमदार सुरवात केली आहे. मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. नद्या धोक्याच्या पातळीजवळ गेल्या आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. पाऊस आला पण त्यांनी भीती निर्माण केली आहे.

संपूर्ण जून महिना प्रतीक्षा केल्यानंतर पाऊस दणक्यात सक्रिय झाला. मात्र, रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रायगड आणि कोकणात धास्ती वाढवली आहे. गेल्यावर्षीच्या पुराच्या आठवणींमुळे यंदा अधिक सतर्कता बाळगली जात आहे. तळकोकणात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. चिपळूणमध्येही जोरदार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील धरणे, नद्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहेत. रोहा येथील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून ठाणे, पालघर जिल्ह्यातही संततधार सुरू आहे. मुंबईत सोमवारी दिवसभर काहीशी उघडीप घेतलेल्या पावसाची सायंकाळपासून बरसात सुरू झाली. त्यामुळे शहरात पुन्हा ‘पाणी’कोंडी झाली.

तळकोकणात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. चिपळूणमध्येही जोरदार पर्जन्यवृष्टीने सर्वत्र पाणी साचले असून डी. बी. जे. कॉलेजचा रस्ता, सावर्डे, कापसाळ रस्ता जलमय झाले आहेत. येथील महामार्गाला तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड-चिपळूणपर्यंत चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे परशुराम घाट धोकादायक बनला आहे. येथे वाहतूक मध्येच थांबवण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात आगामी २४ तासांत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासन सतर्क झाले असून पुणे येथून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.

लांजा तालुक्यातील केळवली मुख्य रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद आहे. राजापूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यालाही पावसाने झोडपले असून हर्चेरी चांदेराईतील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

पेढे ग्रामस्थ भीतीच्या छायेत

परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावचे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. किमान पावसाळ्यात रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्याची मागणी केली आहे, असे सरपंच प्रवीण पाकळे यांनी सांगितले. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पोलिस, महसूल, आरोग्य विभाग, तसेच कंत्राटदार कंपनीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

भिंत कोसळून घरांचे नुकसान

ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडला. दुपारी पावसाचा जोर वाढला आणि रात्री उशिरापर्यंत संततधार सुरूच होती. ठाणे शहरात दिवसभरात ६० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे आणि मुंब्रा येथे चाळींवर सुरक्षा भिंत कोसळून घरांचे नुकसान झाले. यातील एका घटनेत एक जण जखमी झाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे बाधित झालेल्या २१ कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली.  मुंब्र्यातील दत्तवाडीतही सुरक्षा भिंत कोसळून अनिल भगत चाळीचे नुकसान झाले. या चाळीतील १९ खोल्यांतील १७ कुटुंबांना मुंब्रा स्थानकाजवळील महापालिकेच्या शाळा क्र. ७७मध्ये हलविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त शहरात काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या.

रायगडमध्ये दमदार

अलिबाग : रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील धरणे, नद्या पाण्याने भरल्या आहेत. रोहा येथील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शेतांमध्येही पाणी साचल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात १७.८३ टक्के पाऊस झाला. एप्रिलमध्ये तयार करण्यात आलेला अलिबागनजीकचा धरमतर येथील रस्ता पहिल्याच पावसात उखडून गेला. पोलादपूरजवळील कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळण्याची घटना घडली. सुरक्षेचा उपाय म्हणून २० कुटुंबांतील ७५ जणांना पोलादपूर येथे हलवण्यात आले आहे. महाबळेश्वर खोऱ्यामध्ये पर्जन्यवृष्टी होत असल्याने सावित्री नदीची पातळी ४.२० मीटरने वाढली.

पालघर जिल्ह्यात मुसळधार

पालघर : भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. यानुसार सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles