खेड – कोकणातील पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत असलेले रसाळगड आणि रघुवीर घाट एक जुलैपासून दोन महिन्यासाठी प्रशासनाने पर्यटनासाठी बंद केले आहेत. रस्ता व डोंगर ढासळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. याबाबतचा लेखी आदेश उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दिला आहे.
खेड तालुक्यातील रघुवीर घाट व रसाळगड ही दोन ठिकाणी कोकणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची आवडती ठिकाणे गेल्या काही वर्षापासून बनू लागली आहेत. गतवर्षीच्या अतिवृष्टीत या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यटनासाठी जाणे हे जीवावर बेतू शकते, ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांनी रसाळगड व रघुवीर घाट पर्यटनासाठी १ जुलैपासून पुढील दोन महिने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशान्वये पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे; परंतु सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने उचलेल्या या पावलाचे स्वागतदेखील पर्यटकांकडून करण्यात येत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाट (मिनी महाबळेश्वर) पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने पलीकडच्या सातारा जिल्ह्यातील गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटणार आहे. तर रसाळगडावरदेखील पर्यटकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी वापरता येणार
रघुवीर घाटातील रस्ते खचले आहेत. दरड कोसळ्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होऊ नये. अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे. तसे आदेश मी पारित केले आहेत; परंतु सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील गावांना विविध कामे, औषधोपचार आणि अत्यावश्यक सेवेसाठी घाटाचा एकमेव पर्याय असल्याने ते या घाटरस्त्याचा वापर करू शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी राजश्री मोरे यांनी दिली आहे.
रघुवीर घाट व रसाळगड या ठिकाणी प्रशासनाचा पर्यटनबंदीचा आदेश आम्हाला प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आजपासून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बंदोबस्त सुरू करणार आहोत.
– शशीकिरण काशीद, उपविभागीय पोलिस अधिकारी.