खेड : खेड तालुक्यातील रसाळगड किल्ला हा सुरक्षेच्या कारणास्तव पुढील 2 महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याने हा किल्ला योग्य ती खबरदारी घेऊन पर्यटकांसाठी खुला करावा या आशयाचे निवेदन युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी प्रांताधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना दिले आहे.
रसाळगड पर्यटकांसाठी बंद केल्याने पर्यटकांमध्ये कमालीचे नाराजी पसरली आहे.रसाळगड किल्ल्यावर दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. गडावर असलेल्या झोलाई मातेचे दर्शन घेऊन पर्यटक समाधानी होतात. पावसाळ्यात गडावरून दिसणारा निसर्गाचा नजराणा पाहण्यासाठी पावसाळ्यात या गडावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते मात्र या वर्षी पावसाच्या सुरवातीलाच खेड तालुक्यातील रघुवीर घाट आणि रसाळगड ही दोन्ही पर्यटन स्थळे प्रशासनाने प्रतिबंधीत केल्याने पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. रघुवीर घाट आणि रसाळगड या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या संभाव्य धोका असल्याचे कारण देत या दोन्ही ठिकाणी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. एकीकडे पर्यटन वाढीसाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यावर लाखो रुपये खर्च करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला तालुका प्रशासन पर्यटन स्थळे प्रतिबंधित करून पर्यटकांचा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्दैवी आहे.
खेड तालुक्यातील रसाळगड आणि रघुवीर घाट या दोन्ही पर्यटन स्थळांवर प्रशासनाने बंदी घातल्याने खेड तालुक्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांची पावले दुसऱ्या पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. परिणामी पर्यटन पूरक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे तालुक्याकडे पर्यटक फिरकले नव्हते यावर्षी पर्यटक यायला सुरवात झाली असतानाच तालुका प्रशासनाने रसाळगड आणि रघुवीर घाट बंद केल्याने यावर्षीही पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
रसाळगड किल्लाच्या येथे सध्या तरी कोणताही धोका नाही. रसाळगड येथे जाण्यासाठी नवीन रास्ता केल्यामुळे मागील वर्षी किरकोळ दरडी कोसळल्या होत्या. सध्याच्या परिस्थितीत रस्ता सुस्थितीत असून शासनाची एस.टी. बस सेवा नियमित सुरु आहे. यामुळे येथे पर्यटकांना जाण्यास बंदी घालणे हा अन्याय आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करून किल्ले रसाळगड पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुला चालू करावा अशी विनंती केली जात आहे.