पेण, रायगड – अवैध अशा सावकारी धंद्यासाठी आपल्या सुनेला बंदुकीचा धाक दाखवून आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच पती व सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून दागिने आणि पैशाची मागणी केल्याची घटना घडली आहे. सासरच्यांचा त्रासाला कंटाळून पीडित प्रज्ञा पाटील यांनी २९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर या घटनेची तक्रार या आधी नोंदवण्यात आली असून योग्य तपास करून कारवाई करणार असल्याची माहिती पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पत्रकारांना दिली. या पत्रकार परिषदेत पीडित प्रज्ञा अमर पाटील, यांनी आपला पती, सासरा, सासू, दिर, जाव सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन तसेच आईवडिलांकडून रोख तीस लाख व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून शिवीगाळी व हुंड्यासाठी तसेच अवैध्य अशा सावकारी धंद्यासाठी धमकावण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.