दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पाऊस महाराष्ट्रातून परततो मात्र यंदा परतीचा पाऊस महाराष्ट्रात रखडल्याने परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील कोंकणासह इतर विभागात ,जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. आणि या परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात पिकांना देखील फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरामध्ये रविवारी दुपारपासून विजांच्या कडकडाट मुसळधार वादळी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे, शहरातील गटारे तुडुंब भरून वाहत आहेत, तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील मंदावली आहे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेकडो गावांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन कापणीच्या वेळी पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.