चिपळूण : चौपदरीकरण कामादरम्यान महामार्गावरील परशुराम घाट पोखरताना ठेकेदार कंपनीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे -परशुराम आणि घाटाच्या माथ्यावर सलेले परशुराम ही दोन्ही गावे भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या दोन्ही गावात सुमारे ७० कुटुंबे असून ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून दिवस काढत आहे. गावाबाहेर पडण्याचे सर्वच मार्ग (पायवाट) देखील बंद झाल्याने या दोन्ही गावातील सुमारे ७० कुटुंब क्वारंटाईन व्हावे लागले आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील
होत आहे. तर नोकरी व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांना गावात अडकून पडावे लागले आहे. इतकेच नव्हे तर पाऊस पडत असताना देखील येथील शेतकऱ्यांना शेतात जाऊन लावणी करणी शक्य होत नाही. ‘बा परशुराम आता तूच आमचे गाव माळीण होण्यापासूनच वाचव’ असे साकडे येथील ग्रामस्थ परशुरामाला घालू लागले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम देवस्थान हे या वर्गातील पर्यटन स्थळ आहे. परशुरामाच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात त्यामुळे महामार्गावरील परशुराम घाटात नेहमीच मोठ्या प्रमाणात रहदारी असते. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यावर परशुराम घाटाचे काम देखील वेळेत सुरु होणे गरजेचे होते मात्र जमिनीच्या आर्थिक मोबदल्यावर परशुराम देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने तीन वर्ष परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचा नारळ फुटला नव्हता. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर न्यायालयाने पोलीस बंदोबस्त घेऊन काम सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि २०२१ च्या डिसेंबर महिन्यात परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचा नारळ फुटला. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यावर घाट माथ्यावर असलेले परशुराम आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेली पेढे-परशुराम या गावांना उदभवणारा संभाव्य धोका ओळखून प्रशासन आणि ठेकेदार कंपनी यांनी आवश्यक ती उपाययोजना करायला हवी होती मात्र तशी कोणतीही उपाययोजना न करता घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आल्याने आधीच धोकादायक असलेल्या घाट आणखीनच धोकादायक झाला.
जेव्हा ठेकेदार कंपनीने परशुराम घाटातील डोंगरांची खोदाई सुरु केली तेव्हाच घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे-परशुराम आणि घाटमाथ्यावरील परशुराम या गावातील ग्रामस्थांना संभाव्य धोक्याची चालूल आली होती. ठेकेदार कंपनी आणि प्रशासन यांना ग्रामस्थांनी तसे सांगण्याचा प्रयत्नही केला होता. डोंगरांची खोदाई करण्याआधी घाटाच्या दोन्ही बाजूला तसेच संरक्षक भिंत घातली जावी अशी सूचना ग्रामस्थांनी केली होती मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्याकडे प्रशासन आणि ठेकेदार यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने घाटाच्या पायथ्याशी वासलेलंलय परशुराम आणि पेढे या दोन्ही गावातील ग्रामस्थांना डोक्यावर दरड कोसळण्याची टांगती तलवार घेऊन जीवन जगावे लागत आहे.
परशुराम गावातील डोंगराची खोदाई करताना दरड कोसळण्याचा धोका वाढल्यानंतर हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळे या दोन्ही गावातील ग्रामस्थांना गावाबाहेर पडणे अशक्य झाले. चिपळूण, खेड या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त येणाऱ्यांवर गावातच क्वारंटाईन होण्याची वेळ आली परशुराम येथे असलेल्या एएसपीएम या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र घाट रस्ताच बंद झाल्याने शाळेत कसे जायचे हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले.
पावसाळ्यात घाट माथ्यावरील परशुराम आणि घाटाच्या पायथ्याची वसलेल्या पेढे-परशुराम या गावातील ग्रामस्थांना दरड कोसळण्याचा धोका वाढल्यानंतर प्रशासनाने ७० कुटुंबांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित व्हावे अशा नोटिसा बजावला मात्र या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्याने या ठिकाणी आम्ही राहायचे कसे असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.