खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
बांधकाम विभाग, पोलीस आणि अन्य आपत्ती निवारण यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून रस्त्यावर आलेली दरड बाजूला केल्यावर तब्बल तीन तासानंतर घाट वाहतुकीस खुला झाला.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट अतिशय अवघड घाट मानला जातो. सध्या या घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने घाट धोकादायक झाला आहे. उन्हाळ्यात जेव्हा घाटाचे काम सुरू करण्यात आले तेव्हाच दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता तर दोन जेसीबी मशीन दरडीखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेनंतर घाटात खबरदारी घेत घाटाचे काम सुरु ठेवण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी घाटाचे चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र घाटाचे 50 टक्के काम देखील पूर्ण होऊ न शकल्याने परशुराम घाटातील दरड कोसळण्याचा धोका आणखीनच वाढला.
काल रात्री कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास परशुराम घाटात दरड कोसळली आणि घाट वाहतुकीस बंद झाला. घाट बंद झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. घाटात दरड कोसळल्याची खबर मिळताच बांधकाम विभाग, पोलीस तसेच अन्य आपत्ती निवारण यंत्रणा घाटात दाखल झाल्या. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर रस्त्यावर आलेली दरड बाजूला करून घाट वाहुकीस खुला करण्यात आला. परशूराम घाट अजूनही वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने वाहतूक चिरणी मार्गे वळविण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.