रत्नागिरी : सलग आलेल्या सुट्यांचा आनंद घेताना येथील समुद्रात पोहण्याचा मोह बिहारच्या तीन कामगारांना महागात पडला. तिन्ही तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात समुद्रात बुडाले. त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले, तर एक तरुण अद्याप बेपत्ता आहे. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पांढरा समुद्र येथे ही घटना घडली. शनिवार, रविवार सुटीनंतर सोमवारी १५ ऑगस्ट असल्याने सर्व आस्थापना बंद होत्या. फिनोलेक्स कॉलनीशेजारी कोस्टगार्डच्या रहिवासी इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी मजूर म्हणून परराज्यातील काही कामाला आले आहेत. त्यापैकी तीन कामगारांना समुद्रात पोहण्याचा मोह टाळता आला नाही. त्यासाठी ते पांढरा समुद्र येथे दाखल झाले. मात्र, ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.
किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी समुद्राच्या पाण्यात सेल्फीसह व्हिडिओ करण्यास सुरू केले. मद्य घेतल्याने त्यांना नीट उभेही राहता येत नव्हते. त्यांचा तोल जात होता, तरी पाण्यात उड्या मारत होते. त्यातील एक तरुण हा मोबाईलवर चित्रीकरण करत होता, तर दोघेजण समुद्राच्या लाटांवर उड्या मारत होते. बघता बघता त्यातील एकजण पाण्यात ओढला गेला आणि अचानक गायब झाला. तो बुडत असताना त्याचा एक हात वर दिसत होता. काही स्थानिक ग्रामस्थांनी दुरून त्याला बुडताना पाहिले. मात्र, ते समुद्रकिनारी पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता.
मुरूगवाडा परिसरातील ग्रामस्थांनी समुद्रात धाव घेतली. त्यातील दोघांना पाण्यातून बाहेर काढले. अमन खान तरुण नशेमध्ये फार धुंद झाला होता. त्याच्या शेजारी असलेला त्याचा सहकारी अमीर खान हा कधी बेपत्ता झाला, हे त्याला कळलेच नाही. ग्रामस्थांनी त्यातील दोघांना पाण्यातून बाहेर आणले आणि त्यांची विचारपूस सुरू केली. त्या वेळी आपण फिनोलेक्स कॉलनीशेजारी कोस्टगार्डच्या मातीचे बांधकाम करणारे कामगार आहोत. त्याच ठिकाणी राहायला असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबतची माहिती तत्काळ शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रात पोहण्यासाठी आलेले हे तिघेही मूळचे किशनगंज बिहारचे आहेत. सध्या ते रत्नागिरीत वास्तव्याला असून या घटनेची माहिती त्यांच्या ठेकेदाराला देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, समुद्रात बेपत्ता झालेला आमीर खान याचा शोध सुरू आहे. त्याबाबतची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.