दापोली: तब्बल १ कोटी ९८ लाख रूपये शासनाचा निधी खर्च करून नव्याने बांधलेला पाडले येथील उभ्या धोंडीजवळील रस्ता पहिल्याच रिमझिम पडणाऱ्या पावसात खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या सुमार दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.दि. ३ जून २०२० रोजी घोंगावलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने समुद्रात उसळलेल्या पाण्याच्या लाटांच्या माऱ्यांने पाडले. येथील उभ्या धोंडीजवळील समुद्राकडील रस्त्याची बाजू ढासळली होती. त्यामुळे दापोली हर्णेकडून आंजर्ले समुद्र किनारी भागातून पाडले, आडे, केळशी, मांदिवली, देव्हारे, मंडणगडकडे जाणारा हा मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवावा लागला होता.
रस्त्याअभावी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही बाब माजी उपसभापती आणि पाडलेचे सरपंच रविंद्र सातनाक यांनी आमदार योगेश कदम यांच्या निदर्शनात आणून दिली. त्याची आ. योगेश कदम यांनी तातडीने दखल घेऊन ढासळलेल्या रस्त्याची दुरूस्ती कामासाठी शासनाच्या पूरहानी या शिर्षखालील योजनेतून तब्बल १ कोटी ९८ लाखांचा विकास निधी प्रयत्न करून मंजूर करून घेतला. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसह संरक्षण भिंत उभारण्याचे काम मार्गी लागले आणि या मार्गावरील खंडीत वाहतूक पूर्ववत सुरू झाली याचा या परिसरातील लोकांना आनंद होत नाही.तोच बांधकामानंतरच्या पहिल्याच पावसात पुन्हा रस्ता ढासळल्याने या मार्गावरील एस्टी सेवा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. काम करणारा ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, असे येथील लोकांच्या मागणीने जोर धरला आहे.
आंजर्ले, पाडले, आडे, केळशी,मांदिवली, देव्हारे, मंडणगड या मार्गाचे महत्व लक्षात घेता या रस्त्याअभावी लोकांची गैरसोय हाऊ नये, यासाठी शासनाकडे प्रयत्न करून आ. योगेश कदम यांनी आडे, आंजर्ले, दहागाव रस्ता रा.मा. १३८ मध्ये पूरहानी दुरूस्ती किमी २.२०० ते ३.२०० रस्ता दुरूस्ती व संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल १ कोटी ९८ लाख रूपयांच्या रक्कमेचा निधी अगदी तातडीने मंजुर करून घेतला या मंजूर रक्कमेतून रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे आडे, पाडले, आंजर्ले, केळशी परिसरातील रहिवाशांना शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना, रुग्णालयात जाणाऱ्याना, शासकीय कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्याना, बाजारहाट करणाऱ्या नागरिकांसह प्रामुख्याने पर्यटकांना हा मार्ग सर्वात जवळचा व सोयीचा झाला. अस असतानाच बांधकामातील दर्जामुळे नव्याने केलेला रस्ता पहिल्याच पावसात ढासळल्यान आंजर्ले पाडले परिसरातील रहिवाशांना पुन्हा एकदा रस्त्याअभावी गैरसोयींचा नवी सामना करावा लागणार आहे.