रत्नागिरी : चिनी समुद्रातील नोरू या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवारे वाहत आहेत. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे कोकणातही पाऊस पडत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु झालेला पाऊस गुरुवारी दिवसभर होता. रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूरसह लांज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भात कापण्या लांबणीवर गेल्या असून दोन दिवस पाऊस असाच राहिला तर शेतीचे नुकसान होण्याची देखील दाट शक्यता आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६.८९ मिमी पाऊस झाला. त्यात दापोली ६, खेड १२, चिपळूण ४४ मिमी पाऊस झाला. नोरू चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. त्यामुळे रत्नागिरी शहरात आयटीआय परिसरात पाणी साचले होते. सकाळी सर पडून गेल्यानंतर ऊन पडले होते; पण साडेअकरा वाजल्यानंतर पुन्हा पावसाला सुरवात झाली.दुपारी काहीवेळ पावसाचा जोर कमी झाला, तोही अल्पावधीसाठी. दुचाकी चालक पावसात भिजताना दिसत होते.
या पावसाचा फटका भातशेतीला बसणार आहे. पहिल्या पावसात भातलावणी केलेली पिके आता कापणीयोग्य झालेली आहेत. जिल्ह्यात ६८ हजार हेक्टरवर भातलागवड झालेली आहे. हळवी भातं (११० दिवस) कापणीसाठी तयार झालेली आहेत. दसर्याच्या मुहूर्तावर काहींनी कापणीही सुरू केली; पण दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे कापणी थांबवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भातखाचरात पावसाचे पाणी साचले आहे. कापणी केलेले भात पावसात भिजले तर ते खराब होईल. या भितीने कापणी पुढे ढकलण्यात आली आहे. सतत पाऊस पडत राहिला तर उभी भातं आडवी पडून ती पुन्हा रुजू शकतात. गरवी भातं पुढील पंधरा दिवसात तयार होणार असल्याने त्यांना पावसाचा फटका बसणार नाही, असे शेतकर्यांकडून सांगितले जात आहे.
खोल समुद्रात वादळ असल्यामुळे अनेक मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या करून ठेवलेल्या आहेत. पाण्याला प्रचंड वेग आणि जोर असल्याने मच्छीमार धोका पत्करण्यास तयार नाहीत.मिरकरवाडा, जयगड, कासारवेली, साखरतर, काळबोदवी, मिर्यासह आजूबाजूच्या किनारी भागातील नौका बंदरावरच आहेत. त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसणार आहे.