नाशिक :पत्नीचा गळा चिरून पती फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार, 27 जून रोजी सकाळी नऊ वाजता अंबड शिवारातील चुंचाळे येथे उघडकीस आला. संगीता सचिन पवार (वय 25) असे या खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. फरार पती हा औरंगाबादेतील वाळूज पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. अंबडच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड चुंचाळे शिवारात सचिन अशोक पवार मूळ राहणार खिर्डी (ता. खुलताबाद औरंगाबाद) हा पत्नी संगीता सोबत चार दिवसांपूर्वी राहण्यास आला होता. मध्यरात्री अथवा रविवारी रात्री दोघा दांपत्यामध्ये वाद झाले. संशयिताने पत्नीचा गळा चिरून तिचा खून केला. घराला बाहेरून कडी लावून तो फरार झाला. पहाटे औरंगाबाद येथील वाळूज पोलिस स्टेशनमध्ये तो स्वतः हजर झाला. येथील पोलिसांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
संशयित ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी मृत अवस्थेत आढळून आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अंबड पोलिसांचे पथक संशयिताला ताब्यात घेण्यासाठी औरंगाबाद येथे गेले असून संशयिताला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.