पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथील हॉटेल गोल्डन पॅलेस समोर महामार्गावर आज पहाटेच्या वेळी एर्टिगा कार क्रमांक एम एच ०५ सी वी ३२९९ आणि शिवशाही बस यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.
या अपघातात कार मधील जयवंत सिताराम सावंत (वय ५५) हे जागीच ठार झाले, तर किरण मारोती धागे (वय २८) यांना उपचारासाठी पुढे रूग्णालयात नेत असता महाड जवळ त्यांची प्राणज्योत मालवली. अमित मनोहर कितले (वय ३०), जयश्री जयवंत सावंत (वय ५६), गिरीश जयवंत सावंत (वय ३४) हे प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती समजतात स्थानिक नागरिकांसह घटनास्थळी नरवीर रेस्क्यू टीमच्या पदाधिकाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास मदतकार्य केले. हा अपघात नेमका कसा झाला याचा पुढील तपास पोलादपूर पोलिस करीत आहेत.