मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील आवाशी ते लोटे दरम्यान असलेल्या सिईटीपी समोरील ब्रिज वर खड्डे पडलेले असून त्यामध्ये वाहन चालक अपघातास सामोरे जात आहेत. 20 ऑक्टोबरला कार आणि एसटी यांच्यामध्ये अपघात होऊन दोन्ही वाहनांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नव्हती.आणि काल पुन्हा याच ठिकाणी मारुती स्विफ्ट कारचा अपघात झाला.ब्रिजवरील खड्ड्यात गाडी आदळून गाडी उजव्या बाजूला दुभाजकावर आदळून पुन्हा डाव्या बाजूला संरक्षण कठड्यावर आदळळली. या अपघातात गाडीमधील वृद्ध महिलेच्या डोक्याला मार लागला. सुदैवाने मात्र या अपघातात जीवितहानी झाली नाही . तरी सुद्धा हे असे अपघात वारंवार होत असून येथील नागरिक आणि वाहन चालकांमधून महामार्गाच्या ठेकेदारा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गाच्या ठेकेदाराने केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असतानाच येथील सीईटीपी समोरील पेट्रोल पंपाच्या सोयीसाठी येथे अनधिकृतपणे महामार्गाचा डिव्हायडर तोडून पंपामध्ये गाड्या येण्यासाठी रस्त्याला एक्सेस तयार केला हा धोकादायक एक्सेस सुद्धा अपघाताला कारणीभूत होत आहे असे वाहनचालकांमधून सांगितले जात आहे.महामार्गाच्या निकृष्ट दर्जामुळे आणखी किती लोकांचे बळी जाणार आहेत ?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.