खेड : काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2022 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल असे सांगितले होते. पण या कामात घाई केल्याचे परिणाम पहिल्याच पावसात दिसत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते खचले, ठिकठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत .
कोकणातील मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे. कसेबसे या कामाला काही महिन्यांपूर्वी गती मिळाली. डिसेंबर 2022 पर्यत काम पूर्ण होईल असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. आता ज्या ठिकाणी काम रखडले आहे, त्याठिकाणच्या समस्या सोडवून पावसाळ्यापुर्वी राष्ट्रीय महामार्ग आणि ठेकेदार यांनी दिवसरात्र काम चालू ठेवून कामाला गती दिली. आणि खेड – चिपळूण येथील 60 टक्के काम पूर्ण केले. या घाईत केलेल्या कामामुळे पहिल्याच पावसात काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. चिपळूणच्या कामथे घाटात सुरुवातीच्या पावसातच रस्ता खचला. त्यामुळे तेथील वाहतूक बंद करावी लागली. दरम्यान हा रस्ता बनविण्यात आला, पण त्या रस्त्याची लेव्हलही नसल्याने गाडी उडी घेते. या कॉक्रिट रस्त्यामुळे टायरही बाद होतात. हा नवीन रस्ता झाल्यावर प्रवास सुखकर होईल अशी प्रवाशांना आशा होती. दरम्यान, खेड मधील आइनी फाट्याजवळ तर रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत..त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविली जाते..
महामार्गाच्या चौपदरीकरणात नव्याने तयार करण्यात आलेला रस्त्याची सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्यातल्या त्रूटी दुर कराव्यात आणि चांगला रस्ता करून त्यावरून आमचा प्रवास सुखकर व्हावा असे प्रवासी म्हणत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून अशा प्रकारच्या रस्त्याला भेगा पडल्याने पुन्हां एकदा निकृष्ट कामाचा प्रश्न समोर आला आहे.