चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग पडली आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दुसरीकडे रघुवीर घाटवाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
प्रसाद रानडे, चिपळूण : कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे. याचा मोठा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर झालेला दिसून येत आहे. याच मार्गावर चिपळूण रत्नागिरी दरम्यान असलेल्या कामथे येथे रस्त्यावर मोठी भेग पडल्याने खळबळ उडाली आहे. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली असून खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरड कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. तब्बल एक महिना कालावधीत हा घाट काहीकाळ वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. तरीही मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अनेक ठिकाणी अजस्त्र दरडी मार्गावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र या घाटातील वाहतूक तुर्तास सुरळीत आहे. चिपळूण शहरात गुरुवारी संध्याकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. चिपळूण नगरपरिषद प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सतर्क आहे.
खेड खोपीमधील सात घरांचे स्थलांतर
पावसाचा जोर लक्षात घेऊन खेड तालुक्यामधील मौजे खोपी जांभूळवाडी येथील दरडग्रस्त लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये एकूण सात कुटुंबांचा समावेश आहे. एकूण २४ जणांना हलवण्यात आले आहे. त्यामध्ये नऊ लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्व ग्रामस्थांना घराजवळच असणारी जुने राहते घर, तसेच जि. प. शाळा या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी सुरक्षेचा उपाय म्हणून वेळीच स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी दिली.दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा व खेड तालुक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाटवाहतुकीसाठी आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. आशा स्वरूपाचे आदेश खेड तालुका पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी जारी केले आहेत.