मुंबई : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग असून कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबईतही अतीवृष्टीचा इशारा दिला गेला आहे . वसई-विरारमधल्या शाळांना सुट्टी, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तर मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन देखील सतर्क झालं आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या राजधानीत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत आज आणि उद्या अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई- ठाण्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु होतीच मात्र पहाटेपासून पावसानं जोर धरायला सुरुवात केली आहे.मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली असून सध्या अंधेरी सबवेमध्ये अडीच तीन फूट पाणी साठलेलं आहे. त्यामुळे सबवे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. तिकडे ठाण्यातही पहाटेपासून पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे कोपरी, वंदना या भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याशिवाय अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
मुंबईत गेले 2 दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणीसाठा चांगलाच वाढला आहे . सध्या मुंबईच्या सात तलावात मिळून अडीच लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे . पवई तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहत असून मुंबईमध्ये पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे.
परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतूकीसाठी बंद
मुंबई-गोवा महामार्गानं कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चिपळूणमधील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परशुराम घाट कालपासून बंद करण्यात आला असून तो 9 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. घाटात धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे वसई-विरारमध्ये शाळांना सुट्टी
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय… गायलंय… आणि भोलानाथनं वसई-विरारच्या मुलांचं गाऱ्हाणं ऐकलेलं दिसतंय. कारण वसई-विरार महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनानं शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
भिवंडीत पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून होत असलेल्या सततधार पावसामुळे भिवंडी शहरातील कामवारी नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे भिवंडी शहरात पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं भिवंडीकरांची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील तीन बत्ती, भाजी मार्केट, मंडई या परिसरात पुन्हा पाणी साचल्यानं रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे.
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांडवण धरण पूर्ण भरलं
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांडवण धरण पूर्ण भरलं आहे. 5.11 द.ल.घ.मी क्षमतेचे हे धरण असून शाहूवाडी तालुक्यात चार दिवसांपासून जोरदार पाऊस सूरु आहे. कणसा खोऱ्यातील गावांसाठी हे धरण वरदान ठरतं. मात्र आता या धरणाच्या सांडव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी नदी पात्रात येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागांत रात्रभर पावसाची संततधार, बळीराजा सुखावला
बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागांत रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या 86 टक्के पेरण्या झाल्या असल्यानं हा पाऊस शेतीसाठी पूरक असल्यामुळे शेतकरी आनंदात आहे. जिल्ह्यातील पूर्णा नदीला मोठा पूर आला असून सातत्याने नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने एक जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन पथक तयार ठेवले आहे.
दरम्यान, जुलैच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावलीय. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला गेला आहे . कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहे . दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे .