मुंबई: विधानसपरिषदेच्या दहा जागांसाठी आज निवडणूक होत असून अतिशय प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे सहा तर भारतीय जनता पार्टीचे ५ असे अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली असून मतदान प्रक्रिया सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. सामना आणि निकाल आजच जाहीर होणार असल्यामुळे राजकीय वर्तुळातील प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेचा काल ५६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता ‘मला उद्याच्या निवडणुकीची चिंता नाही. चिंता करत बसलो तर शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमण्यांमध्ये जे भिनवलेलं आहे, त्याचा उपयोग काय? हार-जीत होत असते आणि उद्या तर आपण जिंकणारच आहोत,’ असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.