आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये सर्वांच्या मुखी ‘माऊली’ हा एकच शब्द असतो. हाच शब्द घेऊन पोलिसांनी यावर्षी प्रथमच ‘माऊली स्क्वॉड’ची निर्मिती केली आहे. या पथकात 200 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार असून भाविकांनी एकाच जागी गर्दी करू नये, यासाठी हे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
यावर्षी माऊली स्क्वॉडची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये 200 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, हे पथक मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्ग येथे थांबून भाविकांना चालत राहण्याची सूचना करणार आहे. यासाठी गर्दी होणाऱ्या 12 जागा निवडण्यात आल्या आहेत. वारकरी एकमेकांना ‘माऊली’ या नावानेच हाक देतात म्हणून पोलीसदेखील ‘माऊली चालत राहा, थांबू नका’ असे आवाहन करणार आहेत. यामुळे चेंगराचेंगरीसारखे प्रकार टळतील, असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला. यंदा आषाढी वारीसाठी एकूण पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. यामध्ये तीन हजारहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी, दीड हजार गृहरक्षक दल अर्थात होमगार्ड यांचा समावेश आहे.