माणगांव: माणगांव तालुक्यातील कडापूर गावच्या हद्दीत माणगाव पोलिसांनी कारवाई करत व्हेल माशाची ५ किलो ८०० ग्राम वजनाची उलटी पकडली. या उलटीची बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ८० लाख इतकी आहे.
पोलिसांनी केलेल्या या कार्यवाही मध्ये एक कार आणि एका महिलेसह सहाजणांना सापळा रचून ताब्यात घेतले आहे.माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना त्यांच्या खबऱ्याकडून व्हेल माश्याच्या उलटीचा सौदा होणार असल्याची माहिती मिळाली होती.माहिती मिळताच त्यानुसार पोलिसांनी पाचाड-रायगड रोडवर कडापूर गावच्या हद्दीत सापळा लावला होता. दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारजवळ एक कोणीतरी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गोणी तपासली असता गोणीमध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली. चौकशी दरम्यान तो इसम दिनेश उमाजी भोनकर असून सुरव तर्फे तळे तालुका माणगाव येथे राहणार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्यासोबत गाडीमध्ये वैभव बाबुराव कदम, योगिता वैभव कदम दोघेही राहणार नवीन पनवेल,दत्तात्रय मोहन शेट्ये राहणार गिरगाव मुंबई,सुरेश पंढरीनाथ नलगे राहणार ठाणे पश्चिम,सूर्यकांत वसंत पवार राहणार घणसोली नवी मुंबई हे असल्याचे सांगितले. माणगांव पोलिसांनी या सहाही जणांना ताब्यात घेतली असून या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे हे करीत आहेत.