मंडणगड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमधील तीन वर्गखोल्यांची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड करून नासधूस केली. तसेच दरवाजे, पंखा, कुंड्या फोडून टाकण्यात आल्याचा अजब प्रकार घडला आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात याचे पडसाद उमटले असून याबाबत मंडणगड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
४ सप्टेंबरला रविवारी शाळेला सुट्टी होती. त्यादिवशी काही अज्ञात व्यक्तींनी खोली क्र. १६, १७ व १८ या वर्गखोल्यांचे दरवाजे व वर्गातील फॅन तोडून त्याच्या पाती वाकवून टाकल्या आहेत. खोली क्र. १६ मधील शिकवणीचा बोर्ड (फळा) तोडून गायब केला आहे. खोली क्र. १७ वर्गांसमोरील फुलझाडांच्या कुंड्या तोडून फोडून जमिनीवर टाकल्या.
सोमवारी शाळेच्या दिवशी हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर संस्था व शाळेच्यावतीने शाळेचे उपमुख्याध्यापक हुल्लोळी यांनी ६ सप्टेंबरला मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दिला आहे. यानंतर मंडणगड पोलिसांनी याची पाहणी करून तक्रार दाखल करत तपास सुरू केला आहे; मात्र घडलेला हा सर्व प्रकार शैक्षणिक क्षेत्रासाठी चर्चेचा विषय झाला असून समाजातील विकृत, विघ्नसंतोषी घटक असे कृत्य करून नेमके काय साध्य करत आहे, याचे अंदाज बांधले जात आहेत. इमारतीच्या भिंती पाडणे, विटा काढणे, वर्गातील पंखे, लाईट बोर्ड तोडणे असे प्रकारही चालू आहेत. विशेष म्हणजे हे प्रकार वर्गखोल्या बंद असताना सुट्टीच्या दिवशी असे घडत असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. कहर म्हणजे दरवाजे तोडून नेले जात आहेत. पोलिसांनी याबाबत तपासाचा वेग वाढवत असे निंदनीय कृत्य करणाऱ्या व्यक्तीला शोधून काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
संस्थेचे नागरिकांना आवाहन
ही विकृती थांबवण्यासाठी संस्थेकडून शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. समाजातील सूज्ञ नागरिक, शिक्षणप्रेमी नागरिकांनी शाळेला, संस्थेला ही विकृती थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याध्यापक व सर्व संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.