मुंबई : “दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. जयदीप राणा हा भाड्यानं आणलेला माणूस आहे, असं रिव्हर मार्चने स्पष्ट केलंय. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर बाँब फोडणार,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देत “मी पाकिस्तानमध्ये बाँब फुटायची वाट बघतोय”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.वर्षा या निवासस्थानी पत्रकारांबरोबरच्या परिसंवादामध्ये मुख्यमंत्र्याने हे वक्तव्य केले.
तसेच गेल्या काही दिवसांत लसीकरणाचा वेग मंदावला आहे. नागरिक लसीकरणासाठी कमी प्रमाणात येत आहेत, त्यांना पकडून पकडून आणू शकत नाही. तर, कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, “मंत्रालय हे कार्यालय आहे नक्कीच जायला पाहिजे, पण गेलो नाही म्हणून कामं झालं नाहीत असं झालं आहे का? मंत्रालयात जातो येतो, पाट्या टाकतो याला काही अर्थ नाही. वर्षा बंगल्यात कार्यालय आहे, इथून काम सुरू आहे. इतकी वर्षे जे मंत्रालयात जात होते त्यांनी जे काय केलं ते मला निस्तरायचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.