महाड पोलादपूर तालुक्यामध्ये शासकीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असून शुक्रवारी एका आदिवासी बालकाचा या व्यवस्थेमुळे बळी गेला आहे.महाड तालुक्यातील कुंभार्डे आदिवासी वाडी येथील सुमीता नरेश जगताप या महिलेच्या दहा महिन्याच्या बालकाला काही दिवसांपूर्वी ताप आणि जुलाब होत होते. त्याला महाड मधील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले मात्र त्या ठिकाणी बालरोग तज्ञ नसल्यामुळे या बालकाच्या आई आणि सोबत असलेल्या महिलांनी येथील डॉ.सुनील शेठ या बालरोग तज्ञांकडे उपचारासाठी आणले मात्र त्यांनी देखील बाळाची स्थिती पाहून हात वर केले. त्यादरम्यान या गरीब आदिवासी कुटुंबाने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने 108 रुग्णवाहिकेला कॉल केला. मात्र ही रुग्णवाहिका देखील वेळेत पोहोचली नाही. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी खाजगी रुग्णवाहिका बोलावली. महाड ग्रामीण रुग्णालयात या बाळावर पुन्हा उपचार करण्यात आले परंतु प्रतिसाद देत नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींचे शासकीय वैद्यकीय सुविधेवर नियंत्रण नसल्याने, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना नागरिकांना मात्र कोणी वाली नसल्याचे चित्र या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.