चिपळूण : जनावरांवरील लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जास्त नसला तरी या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लसीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. असे असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लसीकरणासाठी संपूर्ण तालुका पूर्णत्वास नेण्यासाठी असलेल्या डॉक्टरांवर ताण वाढला आहे. त्यासाठी नव्याने कंत्राटी डॉक्टरांच्या नेमणुका केल्या आहेत; मात्र ही संख्यादेखील तालुक्याच्या मानाने अपुरीच आहे. आतापर्यंत तालुक्यात २०० हून अधिक जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पशुसंवर्धन विभाग लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाला आहे. पशुवैद्यकीय सार्वजनिक चिकित्सालयाअंतर्गत येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लम्पी जागृतीसंदर्भात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कसा होतो, पशुपालकांनी कोणती काळजी घ्यावी, त्या रोगाची लक्षणे कोणती याबाबत जागृती केली जात आहे.
खबरदारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनादेखील पत्र देण्यात आले आहे. हा आजार तालुक्यात उद्भवला नसला तरी त्याचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने यासाठी शासन आदेशानुसार तालुक्यातील जनावरांना लम्पी लसीकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसे पाहिल्यास लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जरी लसीकरणावर भर देण्यात आला असला तरी त्यासाठी डॉक्टरांची पुरेशी संख्या नसल्याने अपुऱ्या डॉक्टरांचा विषय प्रखरतेने पुढे आला आहे.
पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत ८ दवाखाने येत असून, या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये एकूणच ५ डॉक्टर तर ८ परिचर आहेत तसेच प्रत्येक डॉक्टरावर अतिरिक्त दवाखान्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये देखील हीच वास्तवदर्शी परिस्थिती आहे. त्यांच्या अंतर्गत येणारे २१ दवाखाने असून, त्यामध्ये ७ डॉक्टर व ४ परिचर कार्यरत आहेत.यातील काही डॉक्टरांना इतर तालुक्यांचीही जबाबदारी दिली आहे. कित्येक वर्षांपासून अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न रखडला असून यातूनही अधिकारी, तालुक्यातील पशुसंदर्भात पुरेशा सुविधा देण्यासह योजना, जनावरांची देखभाल, प्रशासकीय कामे करण्यास पुरेपूर पडत आहेत.
कंत्राटी पद्धतीवर १७ डॉक्टरांच्या नेमणुका
अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी लसीकरणासाठी डॉक्टरांची ओढाताण होत आहे. अशातच जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये कंत्राटी पद्धतीवर १७ डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. एकीकडे शासनाच्या उदासीनतेमुळे पुरेशी संख्या पशू विभागात न भरल्यामुळे परिणामी अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर हा विभाग कसाबसा सुरू आहे. अशाही स्थितीत लम्पी लसीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे.