दिवसेंदिवस वाढत चालेल्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतानाच आता स्वयंपाकाचा गॅस महागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य माणसाने जगायचे तर कसे जगायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकरी व्यावसायावर गदा आली. अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाने हिरावून नेला. जगण्यासाठीचा संघर्ष कमालीचा वाढला असतानाच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडू लागले. इंधनाचे भाव वाढल्याने त्यांचा परिणाम थेट जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्यावर झाल्याने सामान्यांच्या जेवणातून डाळ, भाजी गायब झाली. हे कमी कि काय म्हणून आता स्वयंपाकाचा गॅस ही मागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हेच का ते अच्छे दिन असे म्हणायची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे.
सिलेंडरच्या बुकिंग मध्येही बदल होणार
१ नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या बुकिंग मध्येही बदल होणार आहे. एलपीजी सिलिंडर वितरणाची संपूर्ण प्रक्रियाच बदलणार आहे.गॅस सिलिंडर बुकिंग केल्यावर ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय जेव्हा सिलिंडर डिलिव्हरीसाठी येईल तेव्हा ग्राहकाला हा OTP डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. हा कोड सिस्टीमशी जुळल्यानंतरच ग्राहकाला सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार आहे.
कोरोनाच्या काळात झालेली लॉकडाउन आणि त्यानंतर वाढलेली महागाई यामध्ये जनता होरपळून निघाली असतानाच स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गृहिणीचे बजेट पुरते कोलमडून जाणार आहे. खाद्यतेलाचेही दर भरमसाठ वाढले असल्याने दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्नही गृहिणींना पडला आहे.