गावतळे : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुचाकीवरून चाललेल्या तरुणांवर भर दुपारी बिबट्याने अचानक हल्ला केला. दोघांच्याही पायांवर बिबट्याची उडी पडल्याने त्यांच्या पायाला जखमा झाल्या. मात्र, दुचाकी चालवणाऱ्याने प्रसंगावधान राखले, दुचाकी पडू दिली नाही आणि बिबट्यापासून पळ काढला. बिबट्याने त्यांचा पाठलाग केला नाही. वृषभ सुरेंद्र दाभोळकर राहणार असोंड व अमर रवींद्र लांजेकर राहणार शिवाजीनगर, साखरोळी अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाजीनगर (साखरोळी) ते दापोली रस्त्यावर शिवाजीनगर गावच्या हद्दीत हा प्रकार घडला. या भागातील ही तिसरी घटना आहे.
याबाबतच्या अधिक माहितीनुसार सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास अश्विनी ट्रॅव्हल्सच्या सर्व्हिस सेंटरवर काम करणारे वृषभ दाभोळकर व अमर लांजेकर (दुचाकीचालक) हे कारीवने नदीवरील पाण्याचा पंप बंद करण्यासाठी दुचाकीवर जात असताना गावच्या हद्दीत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या नावाच्या कमानीच्या पुढे अचानक झाडीतून बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. दोघांच्या पायावर बिबट्याची उडी पडल्याने दोघांच्याही पायावर जखम झाली. दोघेही दुचाकीचा तोल जाऊ न देता भरधाव वेगाने बिबट्याच्या तावडीतून सटकले. दोघांनाही दोपोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या वर्षातील याच भागातील ही तिसरी घटना असून वनविभागाच्या कारभारावर परिसरातून नाराजीचा सूर आहे.
परिक्षेत्र वनाधिकारी दापोली बोराटे, वनपाल दापोली सावंत, वनरक्षक ताडील भिलारे, वनरक्षक बांधतिवरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेनंतर ग्रामस्थांची मीटिंग घेतली. काय काळजी घ्यावी, या संदर्भात ग्रामस्थांना सूचना केल्या, तसेच त्या परिसरात पेट्रोलिंग सुरू केल्याची माहिती बोराटे यांनी दिली.