चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून, यातील एक दगड एका वाहनाच्या काचेवर पडल्याने काच फुटल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गेले तीन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. तीनही दिवस संततधार होती. यामुळे आता घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याने या मातीमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी परशुराम घाटात डोंगरकटाई झाली असल्याने ही माती भिजून दरड कोसळण्याचा धोका संभवत आहे. अनेक ठिकाणी घाटात रस्त्यावर डोंगरकटाईची माती असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. मुसळधार पाऊस न झाल्याने रस्त्यावरील माती अद्याप वाहून गेलेली नाही. त्यामुळे लोकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. जोरदार पडलेल्या पावसामध्ये घाटातील दगड-माती एका गाडीवर आल्याने या गाडीची काच फुटल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास या परिसरात दरड कोसळण्याचा धोका आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्ग विभाग व आपत्कालीन विभागाने या ठिकाणी उपाययोजना कराव्यात.रात्रीच्यावेळी ये-जा करताना वाहनांना लाईटची व्यवस्था करण्यात येणार होती; मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही उपाययोजना झालेली नाही.
घाटातून वाहनांची रात्रंदिवस ये-जा
लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी चिपळूणमधून अनेक अधिकारी, कामगार ये-जा करत असतात. तीन शिफ्टमध्ये हे काम चालते. या शिवाय एसटी गाड्यांसह अनेक खासगी व मालवाहू वाहने घाटातून रात्रंदिवस ये-जा करत असतात. त्यामुळे लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.