रत्नागिरीतील खेड तालुक्यातील मोहाने, ऐनवली, नानावले पंचक्रोशीत सध्या वाघाने धुमाकूळ घातला असल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये कमालीची घबराट निर्माण झाली आहे. मोहाने गावच्या रहाटीमध्ये तीन-चार जनावरांचा तर ऐनवली मोहल्ल्यातील व नानावले येथील लहान वासरांचाही या वाघाने फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. दुचाकीवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही कधीही कुठल्याही वेळेत या वाघाचे दर्शन घडत आहे. त्यामुळे रस्त्याने चालत यायला जायलाहि नागरीक घाबरत आहेत. जोपर्यंत या वाघाचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत घराबाहेर न पडण्याचा विचार काही लोकांनी केला असला तरी घरात बसून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे काय ? असा प्रश्नही त्यांना सतावत आहे. अखेरीस या वाघाचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे विनंतीवजा निवेदन ग्रामस्थांच्या वतीने खेड वनविभागाला देण्यात आले आहे. मात्र खेड वनविभाग ग्रामस्थांच्या या निवेदनाकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत नागरीकांनी बोलून दाखविली आहे. तरी खेड वनविभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून परिसरातील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना दिलासा दयावा, अशी मागणी होत आहे.