दुर्घटनामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील लोटे एमआयडीसी मधील एका नामांकित मोठ्या कंपनीमध्ये काही प्रमाणामध्ये गॅस गळती झाल्याची घटना मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी घडली. यामध्ये दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी कामगार हे परराज्यातील रहिवासी असून त्यांच्यावर चिपळूण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही दुर्घटना घडल्यानंतर कंपनी व्यवस्थापकाने याबाबत गुप्तता पाळली, मात्र जखमी कामगारांमुळे हे प्रकरण समोर आले आहे, यासंदर्भात पोलीस तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळ व शासनाच्या आरोग्य व सुरक्षा विभागाला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे . ज्या कंपनीत ही दुर्घटना झाली त्या कंपनीत गेल्या वर्षभरात तीन ते चार अशाच प्रकारच्या दुर्घटना झाल्याचे बोलले जाते. कामगारांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.