खेड – रत्नागिरी | प्रतिनिधी
खेड तालुक्यातील कुडोशी गावात ५ एप्रिल २०२० रोजी एका महिलेवर अत्याचार झाल्याच्या गंभीर घटनेत आता न्याय मिळाला आहे. या प्रकरणात रवींद्र सीताराम पवार (वय ४८, रा. कुडोशी, खेड) याला कोर्टाने १० वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी दिला.
आरोपीने पीडित महिलेच्या घरी जबरदस्ती घुसून तिच्यावर प्रेम करण्याचा तगादा लावला. तिने नकार दिल्यावर त्याने तिला पट्ट्याने मारहाण केली आणि डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून लैंगिक अत्याचार केला. या अत्यंत अमानुष घटनेनंतर महिलेनं पोलिसांकडे तक्रार केली होती.
सरकार पक्षातर्फे ॲड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले. एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले आणि न्यायालयात त्यांचे जबाब नोंदवले गेले. या पुराव्यांच्या आधारे आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड परिसरात या निकालानंतर समाधान व्यक्त होत आहे.