चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असा परशुराम घाट धोकादायक झाला असल्याने गेल्या ९ दिवसांपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. लोटे चिरणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असून रहदारी वाढल्याने या १२ किलोमीटर अंतरासाठी तब्बल दीड तास कालावधी लागत आहे. यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारवर्ग व शालेय विद्यार्थीदेखील हैराण झाले आहेत.
मुसळधार पावसात परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळत आहेत. त्यातच ५ जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. त्यामुळे धोकादायक बनलेला परशुराम घाट वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ९ व १२ जुलैला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने तेव्हापासून अगदी आजपर्यंत घाट बंदच आहे. परिणामी महामार्गावरील अवजड वाहने ४ दिवस अडकून पडली होती. अखेर २ तासांसाठी परशुराम घाट खुला करत लोटे व शहरानजीकच्या कापसाळ येथे अडकून पडलेल्या सर्व अवजड वाहनांना घाटातून एकेरी मार्गाने सोडण्यात आलं . त्यानंतर पुन्हा घाट वाहतुकीस बंद केला आहे. तात्पुरता पर्यायी मार्ग म्हणून लोटेहून येण्यासाठी चिरणी मार्गाचा तर चिपळूणहून खेडकडे जाण्यासाठी शेल्डी मार्गाचा वापर केला जात आहे. त्यासाठी जागोजागी पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत या पर्यायी मार्गावर पोलिसांचे सकाळ व संध्याकाळच्या वेळेत दुर्लक्ष होत असल्याने चिरणी मार्गावर एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहने जात आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोडींचे मोठ्या प्रमाणावर होत आहे . आधीच पावसामुळे हा पर्यायी रस्तादेखील धोकादायक बनला आहे. त्यातच वाहनांची रहदारी वाढल्याने लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारवर्ग हैराण झाला आहे. पर्यायी मार्गावरील १२ कि.मी. अंतर पार करण्यासाठी दीड तास लागत आहे. यामध्ये लोटे, परशुराम, दाभीळ व शिवफाटा येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत.
परशुराम घाटास पर्यायी मार्ग म्हणून चिरणी व शेल्डी रस्त्याची निवड केली असली तरी हे दोन्ही रस्त्यांमध्ये महामार्गावरील वाहनांची रहदारी सामावून घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही रस्त्यावर एकेरी वाहतूक करणे सोयीचे आहे; परंतु सकाळी व संध्याकाळी रहदारीच्यावेळी पोलिस बंदोबस्त नसल्याने एकाच मार्गाने वाहनांची ये-जा होते. त्यातून वाहतूक कोंडीचे प्रकार घडत असल्याने प्रवासी हैराण होत आहेत.