खेड बस स्थानकालगत असलेली संरक्षक भिंत आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना थरकाप उडवणारी ठरली आहे. या अपघातामुळे मुख्य रस्त्यालगतचे गटारे पूर्णपणे तुंबले असून, उर्वरित भिंत अजूनही कमकुवत स्थितीत आहे.
ती देखील कधी कोसळेल सांगता येत नाही, अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. कोसळलेली संरक्षक भिंत ही बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूने होती. याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पादचारी व वाहनांची वाहतूक होत असते. विशेष म्हणजे या भिंतीशेजारी दुकाने, फेरीवाले आणि जाहिरात फलक देखील आहेत. काही महिन्यांपूर्वी वादळात या भिंतीला लागून असणारा एक मोठा जाहिरात फलक कोसळला होता. त्यावेळीच ही भिंत जीर्ण झाली असून तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आणि अखेर आज ही घटना घडली. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासीवर्गांत संतापाची लाट उसळली आहे. सध्या संततधार पावसामुळे भिंतीची स्थिती आणखीच खराब झाली आहे. कोसळलेल्या भागामधून गटाराचे पाणी साचून प्रवाह थांबला असून दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे परिसरातील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी एकमुखाने मागणी केली आहे की, “राज्य परिवहन विभागाने तातडीने लक्ष घालून ही जीर्ण भिंत पूर्णपणे पाडावी व नव्याने मजबूत संरक्षक भिंत उभारावी.” प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.