मुंबई गोवा महामार्गवरील भरणे वेरळ दरम्यानच्या जगबुडी पुलानजीक मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही पुलांच्या मध्यभागी असलेल्या घळीतून 100 फूट खोल जगबुडी नदीपात्रात कोसळला आहे. या अपघातात टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नदीच्या पात्रातील खेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनही तुटली आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा पहाटेपासून बंद झाला होता. महामार्गवरील रस्त्यावर थंडीच्या वातावरणामुळे दाट धुके असते, त्यामुळे वाहन चालकांना पुढील रस्त्याचा अंदाज येत नाही. अपघातग्रस्त टँकर भरणे पुलावरुन वेगाने पुढे निघालेला असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट महामार्गच्या दोन पुलाच्या मधील घाळीतून जगबुडी नदीत कोसळला. त्यापूर्वी टँकरच्या चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो जखमी झालेला आहे. त्याला नजीकच्या रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा टँकर कोसळला त्याचा जागेतून भरणे जॅकवेळ मधून खेड शहराला पाण्याचा पुरवठा करणारी पाईप लाईन जाते. ती लाईन तुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पहाटेपासून बंद पडलेला होता. महामार्गांवरील उड्डाणं पूल ते जगबुडी नदीवरील पूल हा महामार्गाचा रस्ता तीव्र उताराचा बनलेला असून त्यापुढे वळण असल्याने अवजड वाहनांसाठी हे ठिकाण डेंजर बनले आहे. अनेक अपघात याच ठिकाणी होतं असून महामार्ग विभागाने या रस्त्याची तपासणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.