खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. नैसर्गिक आपत्ती या सबबीखाली या गावावर ओढवणाऱ्या आपत्तींचे वर्णन करून अपघातग्रस्त , दरडग्रस्तांच्या वारसांना मदत आणि स्थलांतर एवढेच काम आपत्तीनिवारण कक्षामार्फत केले जात आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलं नसल्याने चौपदरीकरणानंतर देखील कशेडी घाटातील चोळई गावावर दरडप्रवण तसेच अपघातप्रवण क्षेत्राचे दुहेरी संकट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कशेडी घाटाच्या सुरवातीला असलेल्या चोळई गावाच्या हनुमान मंदिरालगतच्या संरक्षक कठड्याला ठोकून अनेक कन्टेनर, टँकर्स, जीप, व्हॅन आदी वाहने गावाच्या लोकवस्तीपर्यंत पोहोचली आहे. या गावावर अपघातांची टांगती तलवार कायम असते, तरीही विभागामार्फत याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही.यापूर्वीही अनेक मंत्र्यांनीं कशेडी घाटातील अपघातांबाबत आणि धोकादायक प्रवासासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, आयुक्तांसोबत दौरा केला होता. त्यावेळी दिलेल्या सूचना त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊन सत्तापालट झाल्याने हवेतच विरल्या आहेत. त्यानंतरचे पालकमंत्री सचिन अहिर, प्रकाश मेहता यांनी कशेडी घाटाकडे दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी दौरा करण्याचे टाळलेच आहे. आता चोळई गावातून चारपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. तरीही येथील अपघातप्रवण क्षेत्र असा शिक्का पुसू शकलेले नाहीत.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये चोळई गावांतील राष्ट्रीय महामार्गालगतची लोकवस्तीही दरडग्रस्त होण्यासारखी परिस्थिती माती उत्खननानंतर निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. गेल्या वर्षी या ठिकाणी उत्खननामुळे दरडीचा धोका लक्षात घेऊन चोळईच्या ग्रामस्थांनी उठाव केला होता. मात्र, त्यावेळी अतिवृष्टी काळात दरड न कोसळल्याने कोणताही संघर्ष झाला नव्हता. यंदा पावसाचा जोर वाढताच चोळई येथील या उत्खननाच्या ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर येण्यास सुरवात झाली. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचा उपाय म्हणून चोळई येथील २० कुटुंबांतील सुमारे ७५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचा दावा केला. मात्र, अनेक ग्रामस्थांनी जीवाच्या भीतीने आपापल्या परगावांतील नातेवाइकांच्या घरी आश्रय घेतला आहे.
पोलादपूरपासून गोव्याच्या दिशेने केवळ एक कि.मी. अंतरावर चोळई गावापासून कशेडी घाटातील तीव्र वळणांना सुरवात होते. साधारणत: कशेडी टॅप वाहतूक पोलिसचौकीपर्यंतचे १२ कि.मी. अंतर आणि तेथून पुढे खेड तालुक्यातील ८ कि. मी. चा कशेडी घाट धोकादायक ठरला आहे.
दरडी कोसळल्याच्या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराचा भाग कापण्यात आला असून, पावसामुळे दरडीचे ढिगारे, दगड, मातीसह महामार्गावर खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाला आहे. कशेडी घाटातील डोंगरउतारावरील उत्खननाची दखल घेऊन निर्माण झालेल्या दरडप्रवण क्षेत्राचाही विचार प्रशासनाने न केल्याने आता सरकारनेच करण्याची गरज निर्माण झाली आहे.