खेड – रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे, प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या पोटातील बाळ मरून 24 तास होऊन गेले तरी देखील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हजर न राहिल्याने ती महिला अक्षरशः मृत्यूच्या दारात झुंज देत आहे. ही बाब मनसेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर त्या महिलेच्या पोटातील मृत अरबकाला शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली.
खेडमधील कळंबनि हे उपजिल्हा रुग्णालय आहे मात्र तेथील स्त्रीरोगतज्ञ महिन्यातून चार दिवस देखील येत नाहीत. ग्रामीण भागातील गर्भवती मातांची मोठे हाल या ठिकाणी होतात. रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गोरगरीब महिलांना देखील खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. आज या भीषण प्रकारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.