जुवे : गाव सीमेचे भौगोलिक संदर्भ बदलत चारी बाजूंनी निळाशार पाण्याने वेढलेले गाव म्हणजे जुवे. पारंपरिक होडी वगळता दळणवळणाची कोणतीही साधने नसलेल्या जुवे गावाने बेट म्हणून आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. पर्यटनदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या जुवे बेटाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. याच पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता निसर्ग पर्यटनाच्या विकासासोबत स्थानिक लोकांच्या संस्कृतीचे जतन व रोजगाराला चालना देणे, कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे यादृष्टीने वन विभागामार्फत जुवे येथे कांदळवन उद्यान निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने गत महिन्यामध्ये कांदळवन आणि वनविभागाच्या अधिकार्यांनी जुवे बेटाला भेट देवून पाहणीही केली. कांदळवन उद्यान निर्मितीच्या प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असून त्याला वनविभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूरीला शासनस्तरावरून सकारात्मक असलेला प्रतिसाद पाहता या कांदळवन उद्यान निर्मितीच्या माध्यमातून जलदेवतेने जणू कवेत घेतलेले जुवे बेट पर्यटनदृष्ट्या भविष्यामध्ये जगाच्या नकाशावर येणे दृष्टिक्षेपात दिसत आहे.