दररोज नियमित किमान तासभर योगा, प्राणायाम व आसने केल्याने मन प्रसन्न राहून दैनंदिन कामे करताना नवी ऊर्जा मिळते. शरीर सुदृढ राहून विविध आजार व व्याधींपासून मुक्ती मिळते. त्यामुळे लहानांसह, तरुण व ज्येष्ठांनी निरंतर योगा करावा. योगा हा केवळ शारीरिक व्यायामप्रकार नसून त्याचा मानसिकतेशीही संबंध आहे. मानसिक अवस्था सर्व आजारांचे मूळ कारण आहे. मन स्वस्थ असेल तर शरीरही उत्तम राहाते. हायपर टेंशन, डिप्रेशन, अपचन, निद्रानाश, ब्लडप्रेशर, डायबिटीस, कर्करोग, स्पॉंंडीलायटीस, सायटिका, लठ्ठपणा यासारख्या आजारांपासून दूर राहता येऊ शकते.अलोपॅथी उपचाराने आजार तात्पूरते दूर करता येऊ शकतात. मात्र कायमस्वरूपी उपाय केवळ योगामध्येच आहे. योगामुळे चित्तवृत्तीचे शमन होत असल्याने वासना व भावनांवर मात करता येते. तसेच स्वार्थ, राग व अहंकारासारख्या दुर्गुणांपासून दूर राहण्यास मदत होते.
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असल्यापासून योगाविषयी जनजागृती वाढत आहे . यानिमित्ताने सर्वसामान्यांना योगाचे महत्व पटवून दिले जात असल्याने यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनविले आहे. हा केवळ एका दिवसापूरता इव्हेंट न राहता बाराही महिने योगाबद्दल चर्चा व तो अंगिकारण्याची गरज आहे.