मुंबई: काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सध्या कमालीचे सावध झाले आहेत. मुंबईत सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या सुमद्रकिनाऱ्यालगत असलेले ‘गेट वे ऑफ इंडिया’ पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पुढील काही दिवस याठिकाणी सामान्य नागरिकांना प्रवेश निषिद्ध असेल. ‘गेट वे ऑफ इंडिया’ नेमके किती दिवस बंद राहणार याबद्दल ठोस माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या निर्णयामुळे पोलिसांच्या हाती घातपाताच्या कटाविषयी एखादी महत्त्वाची माहिती लागली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु, पोलिसांकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला भारताबाहेरच्या एका नंबरवरून दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आली होती. भारताबाहेरच्या नंबरवरून हे मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले होते. या नंबरला ट्रॅक करण्यात येत असून यामुळे संपूर्ण पोलीस विभाग अलर्टवर आहे. मेसेजकर्त्याने सांगितले की, जर तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेर दिसेल आणि स्फोट मुंबईत होणार आहेत. धमकी देणाऱ्याने सांगितले होते की, भारतात स्फोट करण्याची जबाबदारी सहा लोकांवर आहे. या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस तपासाच्या कामाला लागले होते.