रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्णै बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे ३० हजार लिटर डिझेल सदृश्य द्रवपदार्थ या नौकेसह जप्त केले. त्याची किंमत सुमारे ४७ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णै बंदर येथे एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी डिझेल सदृश्य द्रवपदार्थ आणला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी हर्णै बंदर येथे आपल्या पथकासह धाव घेतली. तेथे त्यांना सुफी नाव असलेली मासेमारी नौका तेथे आढळून आली. या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या १४ खणांमध्ये सुमारे ३० हजार लिटर डीझेल सदृश्य द्रवपदार्थ आढळून आला. याच नौकेवर हा द्रवपदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही आढळून आला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विवेक आहिरे अधिक तपास करत आहेत.