मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 40 च्यावर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार होते. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची भेट टळली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती उत्तम असल्याचे मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून समजते आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या (दि.24) राजभवनात परतण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. ते उद्या राजभवनात जाणार का याबाबत आज संध्याकाळपर्यंत डॅाक्टर निर्णय घेणार आहेत. राज्यपाल कोश्यारी यांची तब्बेत अत्यंत चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर राज्यपाल राजभवनावर कधी परतनार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झालेत. काही ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत, तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे.शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेयांनी पुकारलेले बंड यशस्वी होण्याच्या मार्गावर असून , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मात्र आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे.