चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून तब्बल २५० एसटी बसेसचे बुकिंग झाले आहे. यामध्ये ३३ ग्रुप बुकिंगचा समावेश आहे. या बसेस मुंबई-पुणे मार्गावर धावणार आहेत.
गणेशोत्सवासाठी चिपळूण तालुक्यात मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले आहेत. खासगी वाहनांकडून गणेशोत्सव काळात अव्वाच्यासव्वा प्रवास भाडे आकारले जाते. यावर्षी तोच अनुभव शेकडो गणेशभक्तांना आला. त्यामुळे या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वेसह एसटी महामंडळाच्या बसेसना पसंती दिल्याचे दिसून येत आहे. परतीच्या प्रवासादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी चिपळूण आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी जादा एसटी बसेसचे नियोजन केले.
त्याला प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गणेशोत्सवापूर्वीच दीडशेहून अधिक जादा एसटी बसेसचे बुकिंग झाले तर आतापर्यंत २५० जादा गाड्यांचे बुकिंग झाले असून त्यामध्ये ३३ ग्रुप बुकिंगच्या बसेस आहेत. दरम्यान, पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सुमारे साठ टक्के चाकरमानी सोमवारी रात्रीपासून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे चिपळूण आगार देखील सज्ज झाले आहेत .