गणपतीपूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत वित्त विभागाने बुधवारी शासन निर्णय जारी केला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
राज्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरोघरी गणपतीची आरास केली जाते. श्री गणेशाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार २९ ऑगस्टपूर्वी होणे आवश्यक आहे. गणेश उत्सवापूर्वी पगार होण्यासाठी ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन देयके जमा करून पुरेसा निधी वितरित करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने वित्त आणि शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता.