राजापूर : महिनाअखेरीला होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आगमनाचे साऱ्यांनाच वेध लागले असून, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सध्या गणेश कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. बाजारपेठेतील वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यात सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. त्याचा सामना मूर्तिकारांनाही करावा लागत असून, गणेशभक्तांना यावर्षी मूर्तीच्या वाढत्या दराचा सामना करावा लागेल. अवघ्या दहा-बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या गणेशोत्सवाचे साऱ्यांना वेध लागले आहेत.
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या शाडूच्या मातीच्या किंमतीमध्येही यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. ही माती कोकणामध्ये मिळत नसून, परराज्यांतून आणावी लागते. सर्वसाधारणपणे ही माती किलोवर खरेदी न करता पोत्यावर केली जात असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक पोत्याच्या किंमतीमध्ये ३० ते ३५ रुपये दराने वाढ झाली आहे. त्यातच वाढलेला वाहतूक खर्च आणि गणेशमूर्ती तयार करण्यासाठी अन्य लागणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किंमती, कारागारांची वाढलेली मजुरी या सार्या स्थितीमध्ये गणेशशाळा चालविणे आणि गणेशमूर्ती तयार करणे कारखानदारांना डोईजड झाले आहे. त्याचा परिणाम गणेशमूर्तीच्या किमती वाढणार आहेत.लहान एक फुट उंचीच्या गणेशमूर्ती ची किंमत १२०० रुपये इतकी झाली असून मोठ्या गणेशमूर्तीसाठी आता ४ ते १२ हजार रुपये द्यावे लागणार आहेत .थोडक्यात वाढलेल्या महागाईचा फटका मूर्ती कारांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे.