Food Recipe : अनेकदा एखाद्या स्वीटमार्टमधून आपण आवर्जून ढोकळा (Dhokla) घेऊन खातो. त्यांचा ढोकळा इतका लुसलुशीत आणि चविष्ट होतो मग आपला का नाही असा प्रश्नही आपल्याला पडतो. तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि थोडा वेगळा नाश्ता करायचा असेल तर ढोकळा हा अतिशय चांगला पर्याय आहे.
हेल्दी आणि चविष्ट असलेला ढोकळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.
गुजरातची स्पेशल डीश असलेला हा ढोकळा परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं? काही सोप्या गोष्टी फॉलो केल्या तर आपलाही ढोकळा छान आणि मऊ होऊ शकतो. जाणून घेऊया
साहित्य –
बेसन – १ वाटी
रवा – अर्धी वाटी
आले- मिरची पेस्ट – अर्धा चमचा
हळद – अर्धा चमचा
साखर – १ चमचा
हिंग – पाव चमचा
मीठ – चवीनुसार
लिंबाचा रस – १ चमचा
तेल – अर्धी वाटी
जिरे, मोहरी – अर्धा चमचा
तीळ – अर्धा चमचा
कढीपत्ता – ७ ते ८ पाने
ओलं खोबरं – पाव वाटी (किसलेले)
कोथिंबीर – पाव वाटी (बारीक चिरलेली)
खायचा सोडा किंवा इनो – चिमूटभर
कृती –
- बेसन आणि रवा चाळणीने चांगले चाळून घ्यायचे.
- यामध्ये आलं-मिरची पेस्ट, हिंग, हळद, साखर, लिंबाचा रस, मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून पीठ एकजीव करुन घ्यायचे.
- अंदाजे पाणी घालून घट्टसर पीठ भिजवावे.
- २० मिनीटे पीठ झाकून ठेवून नंतर त्यामध्ये इनो किंवा खायचा सोडा घालावा.
- भांड्याला सगळ्या बाजूने तेल लावून यामध्ये हे पीठ घालावे.
- कुकरला शिट्टी न लावता भांडी कुकरमध्ये ठेवून झाकण लावून १५ ते २० मिनीटे चांगली वाफ येऊ द्यावी.
- लहान कढईमध्ये तेलात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, तीळ, कडीपत्ता घालून फोडणी चांगली तडतडू द्यावी.
- फोडणी गार झाल्यावर फोडणीमध्ये पाणी आणि साखर घालून एकजीव करावी. आवडत असेल तर मिरच्यांचे थोडे मोठे तुकडेही घालू शकता.
- ढोकळे थोडे गार झाल्यावर त्याचे एकसारखे भाग करुन त्यावर फोडणी घालावी. त्यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून ढोकळा खायला घ्यावा.