चिपळूण : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे २१ जूनला रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याबरोबर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. रत्नागिरी विद्युत भवन येथे दुपारी २ वाजता बैठक होणार आहे.
कोयना प्रकल्पासाठी पोफळी परिसरातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक जागांचे संपादन झाले. मात्र, प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्त दाखल्यासह नोकऱ्यांसाठी अजूनही प्रकल्पग्रस्तांच्या शासन दरबारी फेऱ्या सुरूच आहेत. अनेकांनी नोकऱ्या आणि दाखल्यांसाठी उपोषण आंदोलन केले राज्यकर्त्यांकडून त्यांना आश्वासने मिळाली. मात्र, बहुतांशी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. महानिर्मिती कंपनी सह जलसंपदा विभागात नोकऱ्या मिळाव्यात, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.
महानिर्मिती कंपनीमध्ये एकूण ९० कोयना प्रकल्पग्रस्त गेली १० वर्षांपासून प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत कार्यरत आहेत. १५ निर्वाह भत्ताधारक यांचे कंपनी आणि सरकारी धोरणामुळे ४५ वयोमर्यादा होऊन निर्वाह भत्ताधारक बाद होण्याची वेळ आली. प्रगत कुशल योजनेंतर्गत काम करणारे तरुण अनेक वर्षापासून महानिर्मिती कंपनीमध्ये येण्यासाठी धडपड करत आहेत. ६५ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू आहे. उर्जामंत्री रत्नागिरी येथे येणार असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ त्यांची रत्नागिरी येथे भेट घेणार आहे. सर्व प्रकल्पग्रस्ताना काँग्रेस, शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने संघटित करण्यात येत आहे.
जलविद्युत प्रकल्प बाधितांना आवाहन
कोयना जलविद्युत प्रकल्प बाधितांच्या नोकऱ्यांसाठी, जे प्रकल्पग्रस्त अस्थायी नोकरीवर आहेत, जे प्रकल्पग्रस्त आयटीआय होऊनही ज्यांना कामावरच घेतले गेले नाही, ज्या प्रकल्पग्रस्तांना फक्त निर्वाह भत्त्यावरच कित्येक वर्षे काम करून घेतले जाते, परंतु वय उलटूनही कायम नोकरीत सामावून घेतले नाही, ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प बाधित म्हणून मिळालेले दाखले जमा करून घेतले आहेत आणि त्यांच्या वारसांचा रोजगाराचा हक्क त्यामुळे गेला, अशा कोयना जलविद्युत प्रकल्प बाधितांनी दुपारी २ वाजता रत्नागिरी येथील विद्युत भवन येथे जमावे, असे आवाहन केले.