चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा लागणार आहे. मागील चार महिन्यांत वीज खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून तो सगळा आता या जास्तीच्या वीज बिल दरातून भरला जाणार आहे. साधारणतः वीजबिलात ८० ते ३०० रुपये प्रतिमहिना इतकी वाढ होणार आहे .
कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्याने इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. जूनपासून ऑक्टोबरपर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वीज नियामक आयोगाने वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसुलीसाठी वीज कंपन्यांना मंजुरी दिली आहे. विजेच्या दरात यामुळे वाढ होणार असून परिणामी वीज बिल महागणार आहे.याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधणार
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जलविद्युत केंद्रे आहेत. पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. चिपळूण तालुक्यात वीजनिर्मिती केंद्र आहे. त्यामुळे या भागाला इंधन समायोजन आकारातून वगळण्यात यावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.